फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच उघडले जाते हे मंदिर

भारत धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध देश आहे. देशात लाखोंच्या संखेने मंदिरे आहेत आणि त्यातील काही वैशिष्टपूर्ण म्हणून प्रसिद्ध आहेत. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातले बन्सीनारायण किंवा वंशीनारायण मंदिर असेच वेगळे आहे. हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच रक्षाबंधनाच्या दिवशी उघडले जाते. उर्गम घाटी मध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे १३ हजार फुटावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी १२ किमीचा पायी प्रवास करावा लागतो. अतिशय अवघड असा हा मार्ग असला तरी येथे जाणे हा एक वेगळाच अनुभव आहे.

या मंदिराचे महत्व वेगळे आहे. येथे ट्रेकर्स येतात तसेच पर्यटक सुद्धा येतात. रितीनुसार आसपासच्या गावातील बहिणी भावाला राखी बांधण्यापूर्वी येथे पूजा करतात. या मंदिरात विष्णू आणि शिव अश्या दोन्ही देवांच्या प्रतिमा असून गणेश आणि वनदेवीच्या मूर्ती सुद्धा आहेत.

या मंदिराची कहाणी अशी सांगतात, भगवान विष्णू वामन रूपातून मुक्त झाल्यावर सर्वप्रथम येथे प्रकट झाले. त्यानंतर देवऋषी नारद या मंदिरात रोज पूजा करतात असा समज आहे. फक्त राखी दिवशी सर्वसामान्य नागरिक येथे पूजा करू शकतात. मंदिराचा गाभारा फक्त १० फुट उंचीचा आहे आणि येथील पुजारी राजपूत आहेत. येथेच शेजारी भालू गुफा म्हणजे अस्वलाची गुहा असून तेथे प्रसाद तयार केला जातो. या दिवशी गावातील प्रत्येक घरातून येथे लोणी दिले जाते आणि त्यापासून नैवेद्य बनविला जातो. सूर्यास्त होण्यापूर्वी मंदिर बंद होते.

जेव्हा वामन अवतारातील विष्णूने बळी राजाला त्याच्या डोक्यावर पाय ठेऊन पाताळात ढकलले तेव्हा त्याने बळीला, वर माग’ असे सांगतातच बळीने विष्णूला त्याचा द्वारपाल होऊन राहण्यास सांगितले. त्याप्रमाणे विष्णू बळीचे द्वारपाल बनले. विष्णू पत्नी लक्ष्मीने नारदांना विष्णू कुठे आहेत विचारले तेव्हा त्यांनी बळी राजाची कथा सांगितली. विष्णुना द्वारपाल भूमिकेतून मुक्त करण्यासाठी लक्ष्मी रूप बदलून पाताळात गेली आणि तिने बळी राजाला राखी बांधली. ‘ तुला काय देऊ’ असे बळीने विचारताच लक्ष्मीने विष्णूनाच मागून घेतले आणि या प्रकारे विष्णुंची पाताळातून मुक्तता झाली अशी रक्षाबंधनाची कथा सांगितली जाते.