पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकारावरुन मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी

मुंबई – मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांच्या बदल्यांच्या अधिकारावरुन आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या बैठकीत आर.आर.पाटलांनी चांगलाच संताप व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. जर बदल्यांचे अधिकार नसतील तर मला गृहखातेच नको अशा शब्दात आर.आर. यांनी आपला रोष व्यक्त केला.

जर गृहमंत्रालय म्हणून मला काहीच अधिकार नसतील तर मला हे खातंच नको असं सांगत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळं आर.आर.पाटील यांचा संताप पाहून अखेर मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळं आधीच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर उघड-उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या आर. आर. पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

बदल्यांची अधिकार आणि आकडेवारी :मुख्यमंत्र्यांकडे 223 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आहेत. तर गृहमंत्र्यांकडे 991 पोलीस अधीक्षकांच्या आणि उप-अधीक्षकांच्या बदल्यांचे अधिकार आहेत. पोलीस निरीक्षक आणि त्याखालील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार पोलीस महासंचालकांना आहेत. यापुढे पोलीस महासंचालकांचा कार्यकाळ फक्त 2 वर्षासाठीच असेल असं ठरण्यात आलं आहे. तसंच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंडळाला 2 लाख 6 हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार देण्यात येणार आहेत.