मुंबई – प्रख्यात कवी, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि दलित पॅंथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे बुधवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आतडयाच्या कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी बुधवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातून त्याना आदरांजली वाहण्यात येत आहे.
दोन महिन्यापूर्वी नामदेव ढसाळ यांच्या उपचारासाठी मदतनिधी उभारण्याकरता प्रभादेवी येथील रवींद्र नाटयमंदिरात त्यांनी लिहिलेल्या गीतांचा कार्यक्रम झाला होता. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. मराठी दलित साहित्यातील एक मोठे नाव आणि दलित चळवळीतला एक मोठा नेता अशी त्यांची ओळख होती.
१५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात अत्यंत गरीब कुटुंबात नामदेव ढसाळ यांचा जन्म झाला. मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्टयांमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. सुरुवातीच्या काळात त्यांनी उदनिर्वाहासाठी मुंबईत टॅक्सीही चालवली. याच काळात त्यांच्यातील एक साहित्यिक घडत गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रध्दा असणा-या नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली. पुढे १९७२ साली त्यांनी दलित समाजाच्या न्याय, हक्कासाठी दलित पॅँथर या आक्रमक संघटनेचीही स्थापना केली. अमेरिकेतील ब्लँक पॅंथर चळवळीपासून प्रेरणा घेऊन त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती.