खंडाळा : खंबाटकी बोगदा परिसरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणाºया क्रुझर जीपवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात कंटेनरखाली क्रुझर जीप दबल्याने झालेल्या अपघतात मृत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या अपघातानंतर खंबाटकी बोगदा मार्गावरील वाहतूक घाटमार्गे वळवत अपघाताच्या ठिकाणी पोलिसांनी मदतकार्य सुरू केले होते. अपघातात मृत झालेले बहुतांशजण सांगली आणि कराड येथील असण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री कोल्हापूरहून पुण्याकडे क्रुझर (एम. एच. ११. ए. के. ४0१६) ही जीप निघाली होती. या जीपमध्ये सुमारे १४ प्रवासी होते. ही जीप खंबाटकी बोगदा परिसरातील तिसरे वळण ओलांडून जुन्या टोलनाक्याकडे मार्गस्थ झाली असतानाच पाठीमागून भरधाव वेगात एक कंटेनर (एम. एच. 0६. ए. क्यू. २0९३) आला. जुना टोलनाक्याच्या अलीकडे असणाºया वळणावर कंटेनरचालकाचा ताबा सुटला आणि तो शेजारून चाललेल्या क्रुझरवर कोसळला. डोळ््याची पापणी लवण्याच्या आतच कंटेनरखाली सापडून क्रुझर जीपचा चेंदामेंदा झाला.
याच मार्गावरून पाठीमागून येणाºया काही वाहनांतील प्रवाशांनी हा अपघात पाहिला आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. अपघातानंतर काही जणांनी या भीषण अपघाताची माहिती फोनवरून खंडाळा पोलिसांना तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच खंडाळा तसेच महामार्ग पोलीस अपघातस्थळाकडे रवाना झाले. एव्हाना त्या मार्गावरून निघालेल्या वाहनांतील काही प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले़ मात्र, संपूर्ण क्रुझर जीप कंटेनरखाली अडकल्याने त्यांना मदत करणे शक्य झाले नाही. माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झालेल्या व अपघाताचे दृष्य पाहून पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला. यानंतर त्याठिकाणी आलेल्या पोलिसांनी जमलेल्या प्रवाशांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. एव्हाना त्या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. त्यामुळे खंबाटकी बोगदा मार्गावरील वाहतूक थांबवत ती घाटातील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
क्रुझरवर कोसळलेल्या कंटेनर हटविल्याशिवाय मदतकार्य करता येणे शक्य नसल्याचे तसेच त्याशिवाय जखमींना बाहेर काढता येणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिरवळ तसेच सातारा येथून मोठ्या क्रेन्स मागविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार रात्री त्या क्रेन मागविण्यात आल्या. या क्रेन्स आल्यानंतर क्रुझरवर कोसळलेला कंटेनर बाजूला करण्यात आला. कंटेनरच्या खाली क्रुझर जीप पूर्णपणे दबली गेल्याने आतमधील सर्व प्रवासी त्यामध्ये अडकून पडले होते. यानंतर पहारी व इतर लोखंडी अवजारांच्या सहाय्याने चेपलेल्या क्रुझर जीपचा लोखंडी भाग पोलीस आणि घटनास्थळी जमलेल्यांनी तोडण्यास सुरुवात केली.
सुमारे अर्धा तासाची अथक मेहनत केल्यानंतर क्रुझर जीपमध्ये अडकलेल्या १४ जणांना बाहेर काढण्यात आले.
बाहेर काढलेल्या चौदाजणांपैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले़ तर तीन जण गंभीर जखमी असल्याचे आढळले़ अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या तिघांना तत्काळ खंडाळा आणि शिरवळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह नंतर रुग्णवाहिकेतून खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांनी अपघातास्थळास भेट देत पाहणी केली. अपघतातात मृत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़ त्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाहीत. अपघातात मृत झालेले बहुतांश प्रवासी सांगली आणि कराड परिसरातील असण्याची शक्यता आहे.