लंडन – थ्रीडी प्रिंटर तंत्रज्ञानात अभूतपूर्व क्रांती घडवू शकेल असा क्रांतीकारी काँक्रिट प्रिंटर दक्षिण कॅलिफोर्नियातील विद्यापीठात कार्यरत असलेले संशोधक प्रो. बेहरम खाश्नेविक यांनी त्यांच्या सहकार्यांसह तयार केला असून त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. हा प्रिंटर एका दिवसांत २५०० चौरस फूटाचे घर बांधू शकतो. कॉक्रीटचे एकावर एक थर देऊन ही घरबांधणी संगणकात तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे केली जाते.
हा प्रचंड आकाराचा प्रिंटर अथवा जायंट रोबो कौंटर क्राफ्टिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरबांधणी करतो. यामुळे बांधकाम मजुरांवरील खर्च कमी होतोच शिवाय घरबांधणीची किंमतही लक्षणीयरित्या कमी होते. तसेच घरबांधणी एक दिवसांत होत असल्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत, विस्थापितांसाठी तसेच ज्यांची कमाई कमी आहे मात्र स्वतःचे घर असावे अशी मनीषा आहे त्यांचेही स्वप्न यामुळे प्रत्यक्षात येऊ शकणार आहे.
यासाठी संगणकात प्रथम घराचे बांधकाम कसे करायचे याचा आराखडा तयार केला जातो व तो या प्रिंटरला पुरविला जातो. त्यानुसार प्रिंटर बांधकाम करतो. पारंपारिक बांधकाम पद्धतीपेक्षा हे बांधकाम अधिक मजबूत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची घरे, गोलाकार भितीही यामुळे झटपट बांधता येतात तेही कोणताही जादा खर्च न करता असा संशोधकांचा दावा आहे.