इन्फोसिस दीड लाख कर्मचार्‍यांना पगारवाढ देणार

इन्फोसिसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे कांही महिन्यांपूर्वीच हाती घेतलेले कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी कंपनीतील कर्मचार्‍यांना यंदापासून पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच एप्रिलमध्ये पगारवाढ देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कंपनीतील सुमारे १ लाख ५८ हजार कर्मचार्‍यांना यंदा एप्रिलमध्येच पगारवाढ मिळणार आहे.

बहुतेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांतून कर्मचार्‍यांना एप्रिलमध्येच वार्षिक पगारवाढ दिली जाते. मात्र २०१२ मध्ये इन्फोसिसचा फायदा घटल्याने कंपनी कांहीशी अडचणीत आली होती व त्यामुळे कर्मचार्‍यांना आकटोबरमध्ये पगारवाढ दिली गेली होती. नारायण मूर्ती यांनी सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर कंपनीतील अनेक उच्चपदस्थ नोकरी सोडून बाहेर पडले आहेत. तरीही कंपनीने तिसर्‍या तिमाहीत चांगला नफा कमावला आहे.