गाईची डीएनए टेस्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश

एखादे अपत्य खरोखरच त्याच आईबापांचे आहे अथवा नाही हे ठरविण्यासाठी डीएनए टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे आपल्या ऐकिवात आहे.. मात्र एखादी गाय खरोखरच कुठल्या मालकाची आहे हे ठरविण्यासाठी गाईची डीएनए टेस्ट करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिल्याची घटना केरळमधील कोलम येथे घडली आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेची गाय चरण्यासाठी रानात सोडली होती मात्र ती परतून आली नाही. अधिक तपास करताना ही गाय दुसर्‍याच महिलेने तिच्या गोठ्यात बांधल्याचे आढळले. गायीच्या मालकीणीने गाय परत करण्यासंबंधी सांगूनही दुसर्‍या महिलेने ती परत करण्यास नकार तर दिलाच पण गाय तिचीच असल्याचेही सांगितले. यावर सुरवातीला मूळ मालकीणीने पोलिस तक्रार दिली मात्र त्याचा उपयोग न झाल्याने न्यायालयात धाव घेतली.

न्यायमूर्तींनी सर्व हकीकत एकून घेतल्यानंतर वादग्रस्त गाईची डीएनए टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गाईच्या रक्ताचे नमुने पशु दवाखान्यात घेण्यातही आले आहेत. तक्रार दाखल करणार्‍या महिलेकडे या गाईची आई आहे. या आईचे आणि गाईची डीएनए जुळले तर गाय खरच कुणाची हे कळू शकणार आहे. गाईच्या रक्ताचे नमुने तिरूवनंतपुरम येथील राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी येथे डीएनए टेस्टींगसाठी पाठविले गेले आहेत.