चीनमध्ये आईस फेस्टीवलसाठी लक्षावधी पर्यटक दाखल

चीनमध्ये भरविल्या जाणार्‍ या हर्बिन इंटरनॅशनल आईस अॅन्ड स्नो फेस्टीव्हलची सुरवात ५ जानेवारी रोजी झाली असून हा उत्सव महिनाभर चालणार आहे. महात्सवाचे यंदाचे १५वे वर्ष असून यंदाही जगभराच्या विविध भागातून प्रचंड मोठ्या संख्येने पर्यटक येथे आले आहेत.

सन आयलंडवर होत असलेल्या या महोत्सवात बर्फापासून नयनरम्य आणि अद्भूत कलाकृती बनविल्या जातात. त्यासाठी जगभरातील कलाकार येथे उपस्थिती लावतात. सर्वात मोठे आकर्षण असते ते बर्फाच्या इमारतींचे. बर्फापासून प्रचंड आकाराच्या सुंदर इमारती येथे बनविल्या जातात आणि त्या अधिक आकर्षक दिसाव्यात यासाठी रंगीबेरंगी लाईटच्या सहाय्याने त्या सजविल्या जातात. या इमारती तयार करण्यासाठी १० हजारांहून अधिक कामगार रात्रंदिवस काम करतात तसेच या इमारती चमकाव्यात म्हणून त्यांना पॉलिशही केले जाते.

यंदा या महोत्सवासाठी जगभरातून सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे आणि महोत्सव संपेपर्यंत पर्यटकांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.