मुंबई- गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून कोणालाही काही फायदा होणार नाही, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मोदींवर टीका केली होती.
भाजपने मोदींची पंतप्रधानपदासाठी घोषणा केल्यानंतर त्यांनी लगेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. पंतप्रधान हा देशाचा असावा, राज्याचा नाही, असे ठाकरे यांनी म्हटले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, ‘मोदींचे एवढे दिवस कौतुक करणाऱ्यांच्या भूमिकेमध्ये अचानक कसा काय बदल झाला. या बदलामागचे कारण त्यांनी सांगावे. मोदींवर टीका करणाऱ्यांनी प्रथम त्यांची भाषणे ऐकावीत. त्यांची लोकप्रियता का वाढत आहे, याचाही विचार करावा. उगाचच गोंधळून जाऊ नये. मोदींवर टीका करून काहीही फायदा होणार नाही.’