निवडणूक खर्चाचा हिशोब न दिल्यानं 7 नगरसेवकांचं निलंबन

अमरावती – निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब न दिल्यामुळं अमरावती महानगरपालिकेच्या 7 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे निलंबित 7 नगरसेवकांमध्ये 2 सभापतींचा समावेश आहे. काँग्रेसचे हमिजाबी शहा, राष्ट्रवादीच्या निलीमा काळे आणि ममता आवारे, भाजपचे चंदू बिंदानी, आरपीआयचे भूषण बनसोड तर सलग चार वेळा निवडून आलेल्या सेनेच्या दिगंबर डहाकेंचा निलंबित नगरसेवकांमध्ये समावेश आहे.

एवढंच नाही तर निवडणुकीनंतर 30 दिवसात हिशोब न दिलेल्या 305 पराभूत उमेदवारांवरही कारवाई करण्यात आली आहे. दिगंबर डहाकेंनी मात्र याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांवर खापर फोडलं आहे. खर्च वेळेत सादर केल्यानंतरही नगर सचिव तांबेकर यांनी हेतूपुरस्सर वेळकाढूपणा केल्याचा आरोप डहाके यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या या धडक कारवाईमुळं अमरावती महापालिकेत खळबळ माजलीय. आता निलंबीत नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे सर्वांची नजर लागली आहे.