राष्ट्रवादी २२ जागांच्या निर्णयावर ठाम

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत गेल्या वेळेसच्या निवडणूकीनुसार २२ जागाचा फॉर्म्युला अंतिम असणार आहे. त्या निर्णयावरच राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यामाशी बोलताना स्पष्ट केले. त्या मुळे दोन्हीे कॉग्रेसमध्येक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जागावाटपाचा तिढा कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपासून राष्ट्रवादी भवनमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना जाधव म्हणाले, ‘गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी २२ जागांवर आणि काँग्रेस २६ जागांवर निवडणूक लढविल्या होत्या.
त्याप्रमाणे आगामी काळात हाच फॉर्म्युला अंतिम राहणार आहे.’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवल्या जाणा-या लोकसभेच्या २२ जागांचा गेल्या दोन दिवसांपासून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. यामध्येय मतदार संघाचे प्रश्न, सध्याची परिस्थिती आणि संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. २२ जागा लढवण्यावर पक्ष ठाम असल्याचे या वेळी प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत काँग्रेसने यापेक्षा कमी जागा देणार असल्याचे कुठेही अधिकृत कळवले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस २२ आणि काँग्रेस २६ जागांवरच निवडणूक लढवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीत मतदारसंघातील उमेदवारांच्या बदलाबाबत चर्चा झालेली नाही. अनेक मतदार संघातून केवळ एकाच नावाची शिफारस आली आहे. तर काही ठिकाणी एका नावावर सहमतीही झाली आहे. काही ठिकाणी मात्र एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. त्याबाबत पक्ष अंतिम निर्णय घेईल.