नवी दिल्ली – भारताच्या दिल्लीतील व्यापारी प्रतिनिधी देवयानी खोब्रागडे यांच्यावरील कारवाईचे प्रकरण पूर्णपणे मिटल्याशिवाय भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यवहार पूर्ववत होणार नाहीत, असे भारताचे परराष्ट्र खात्यातील संयुक्त सचिव विक्रम दोरायस्वामी यांनी अमेरिकेला कळवले आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांच्या एका भेटीत दोरायस्वामी यांनी पॉवेल यांना हे सांगितले.
या दोन राजदूतांमध्ये चर्चा सुरू असताना श्री. दोरायस्वामी यांनी, ही कारवाई अमेरिकेने सुरू केली असल्यामुळे ती संपवणे ही आता अमेरिकेचीच जबाबदारी आहे असे पॉवेल यांना बजावून सांगितले. येत्या १३ तारखेला खोब्रागडे यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात जबाब नोंदण्यात येणार आहेत. परंतु भारताने ही भूमिका घेऊन अशी कारवाईच आपल्याला मान्य नसल्याचे सूचित केले आहे.
देवयानी खोब्रागडे यांनी अमेरिकेत आपल्या घरात काम करण्यासाठी भारतीय मोलकरीण नेली होती, पण तिला अमेरिकेतल्या कायद्याच्या अनुसार वेतन दिले नाही म्हणून अमेरिकेच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे.