इस्रोची स्वाभीमानी भरारी

भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटन (इस्रो) या संस्थेने जीएसएलव्ही डी ५ या रॉकेटच्या साह्याने चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात सोडला. असे एखादे नवे संशोधन पुढे आले की त्याचे वर्णन मानवाने निसर्गावर मिळवलेला विजय अशा शब्दात त्याचे वर्णन केले जाते पण प्रत्यक्षात आता आपण या रॉकेटचे प्रक्षेपण करून केवळ निसर्गावरच नाही तर अमेरिकेवरही विजय मिळवला आहे कारण या उड्डाणाच्या भारतीय संशोधनात अमेरिकेने अनेक विघ्ने आणली होती. या उड्डाणाने भारताने अंतराळ संशोधनात मोठी झेप घेऊन आपल्या समोर ठेवलेले अमेरिकेचे एक आव्हान मोठ्या कार्यक्षमतेने आणि धाडसाने पार पाडले. क्रायोजनिक इंजिनाच्या निर्मितीत आणि वापरात या संघटनेने स्वावलंबनाचे शिखर गाठले. या तंत्रज्ञानाच्या आधारे जीएसएलव्ही म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉंच व्हेईकल – डेव्हलपमेंट ५ या रॉकेटचे उड्डाण केले. त्यातली कक्षाही महत्त्वाची आहे. त्याच्या साह्याने ४ टन वजनाचा दूरसंचार क्षेत्रातल्या व्यवहारांना गती देणारा तसेच त्यांची क्षमता वाढवणारा उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. हे रॉकेट ४९ मीटर उंचीचे असून त्याचे वजन ४१४ टन आहे. त्याने प्रक्षेपण झाल्यानंतर १७ व्या मिनिटाला सदर उपग्रहाला भूस्थिर कक्षेमध्ये ३६ हजार किलोमीटर उंचीवर स्थापित केले.

या उड्डाणामध्ये अनेक गोष्टी नवीन आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या मोहिमेतून आपण ४ टनापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह अवकाशात नेऊन या कक्षेत स्थापित करू शकतो हे सिध्द झाले. शिवाय हे उड्डाण क्रायोजनिक इंजिनाच्या साह्याने करण्यात आले आहे आणि या इंजिनाचा आपण वापर करू शकलो ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण सुमारे वीस वर्षांपूर्वी अमेरिकेने आपल्याला हे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता. एवढेच नव्हे तर आपण रशियाचे तंत्रज्ञान वापरू नयेे म्हणून आपल्या वाटचालीत अनेक अडचणी आणल्या होत्या. रशियाकडून मिळणारे हे तंत्रज्ञान अमेरिकी तंत्रज्ञानापेक्षा चौपट स्वस्त होते. पण तरीही भारताने अमेरिकेचेच क्रायोजनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे असा अमेरिकेचा आग्रह होता. तो भारताने मानला नाही त्यामुळे अमेरिकी प्रशासनाने चिडून भारतावर अवकाश संशोधनाच्याबाबतीत बहिष्कार टाकला आणि भारताला कोणतेही तंत्रज्ञान द्यायचे नाही असा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या दडपणाला भीक न घालता भारतीय शास्त्रज्ञांनी वीस वर्षे प्रयत्न करून आणि रशियन तंत्रज्ञानाचा वापर करून क्रायोजनिक इंजिन तयार केले.

अमेरिकेने आपल्याला हे तंत्रज्ञान नाकारल्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सीनेसुध्दा आपल्याला ते देऊ केले होते. पण त्यांचीही किंमत जास्त होती. शेवटी व्यक्ती असो की देश त्यांच्याकडे स्वाभिमान असेल तर तो अशा दडपणाला न घाबरता स्वतःचा मार्ग आक्रमत असतो. अशा प्रकारच्या अडचणीतून प्रगतीच होत असते. तसेच भारताचे झाले. भारताने जर स्वतःचे क्रायोजनिक इंजिन तयार केले असते तर भारताचा समावेश या तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या पहिल्या सहा देशात होणार होता. त्यामुळे तसा तो होऊ नये म्हणून चीन आणि जपान यांनीसुध्दा भारताला क्रायोजनिक तंत्रज्ञान देण्यास नकार दिला. या तंत्रज्ञानामध्ये काही गोष्टी गुंतागुंतीच्या होत्या. कारण त्यात द्रव वायू वापरावे लागत होते आणि हे दोन द्रव वायू -१५० ते -२३५ एवढ्या कमी तापमानाला वापरणे गरजेचे होते. एवढे थंड वायू तयार करून त्यांचा इंधन म्हणून वापर करणे ही गोष्ट तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूपच गुंतागुंतीची होती. पण भारतीय शास्त्रज्ञांनी त्यावर मात केली. आपल्याही हे तंत्रज्ञान रशियाकडून काही प्रमाणात स्वस्तात मिळाले परंतु आपण स्वतः याचा वापर करू लागलो तेव्हा ते रशियापेक्षा खूप स्वस्तात पडायला लागले. केवळ क्रायोजनिक इंजिनच नव्हे तर अवकाश संशोधनाच्याबाबतीतील सगळीच तंत्रज्ञाने भारतात अतीशय स्वस्त पडत आहेत. अमेरिकेत ज्या मोहिमेला किंवा प्रक्षेपणाला ५०० कोटी रुपये लागतात त्याच मोहिमेला भारतात १०० कोटी रुपयेसुध्दा लागत नाहीत.

त्यामुळे जगभरातल्या स्वतःचे उपग्रह अवकाशात सोडण्यास उत्सुक असणार्‍या देशांचा भारताकडे ओढा आहे आणि भारताला आता प्रक्षेपणाचा व्यवसाय करण्यास मोठी संधी आहे. कधीतरी अमेरिकेचा एखादा उपग्रह भारतातून अवकाशात सोडला जाऊ शकतो. या व्यवसायातून आपल्याला चांगली प्राप्ती होऊ शकते. हा व्यवसाय किती तरी बाबतीत अफलातून आहे. या कामात मोठी गुंतवणूक करावी लागते ती आपण गेल्या वीस वर्षात थोडी थोडी करीत केली आहे. पण आता या गुंतवणुकीतून आपल्याला उत्पन्न मिळवण्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. या व्यवसायाचा पाया, आधार आणि भांडवल मानवी बुद्धी हेच आहे. जी बुद्धी भारतीयांकडे आहेच कारण त्यामुळेच अमेरिकेच्याही अवकाश संशोधनात काही भारतीय आघाडीवर आहेत. मुख्य म्हणजे ज्या लहान लहान देशांना आपले उपग्रह अवकाशात असावेत असे वाटते त्यांना आपण त्यांच्या प्रक्षेपणात मदत करू शकणार आहोत. विशेष म्हणजे या व्यवसायातून कसलेही प्रदूषण होत नाही. किमान प्रदूषणात कमाल उत्पन्न मिळवून देणारा हा धंदा आहे.