कणकवली – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. हा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून कसा घेता येईल, याचा विचार सुरू असल्याची ग्वाही उद्योगमंत्री तसेच मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी अनेक प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीच्या अनेक बैठका झाल्या.
राज्याच्या सर्व भागात जाऊन लोकांची मते अजमावण्यात आली आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गीय अथवा इतर कोणत्याही घटकांचे आरक्षण कमी केले जाणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला जाईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यासाठी इतर राज्यातील आरक्षणाचा अभ्यास केला जात आहे.
राज्यातील विजेचे दर कमी करता येतील का याचा विचार करण्यासाठी राज्य सरकारने माझ्याच अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. या समितीच्याही अनेक बैठका झाल्या असून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. घरगुती, शेती आणि व्यावसायिक विजेचे दर १० ते २० टक्क्यांनी कमी करण्याबाबत समितीने अभ्यास केला असून तसा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला असल्याचे राणे यांनी सांगितले.