मंगळावरील वारीसाठी ६२ भारतीयांची निवड

लंडन – मंगळावरील वन वे ट्रिपसाठी नेदरलँडच्या मार्स वन संस्थेने निवडलेल्या जगभरातील नागरिकांत ६२ भारतीयांची वर्णी लागली असल्याचे संस्थेने जाहीर केले आहे. या संस्थेने या मिशनसाठी आलेल्या २ लाख अर्जामधून १ हजार जणांची निवड केली आहे. हा महत्वाकांक्षी खासगी प्रकल्प मंगळावर कायमस्वरूपी मानवी वस्ती वसविण्यासाठी राबविला जात असून त्या अंतर्गत प्रत्येक फेरीत ४ पुरूष आणि महिला मंगळावर पाठविल्या जाणार आहेत. हे मिशन २०२४ पासून सुरू होणार आहे.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या मिशनसाठी जगभरातील १४० देशांतून दोन लाख अर्ज आले होते. त्यातून १०५८ जणांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. ही निवड करताना संबंधित प्रवाशाची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. निवड झालेल्या नागरिकांत अमेरिका आघाडीवर असून त्यांचे २९७ त्यापाठोपाठ  कॅनडाचे ७५, व नंतर भारतीय ६२ नागरिक निवडले गेले आहेत त्यापाठोपाठ चौथ्या नंबरवर रशिया असून त्यांचे ५२ नागरिक निवडले गेले आहेत. या मोहिमेसाठी २० हजार भारतीयांनी अर्ज केला होता.

संस्थेचे सहसंस्थापक लॅन्सड्रॅप सांगतात की ज्यांची निवड झालेली नाही त्यांना निराश होण्याचे कारण नाही. २०१४ आणि १५ सालात पुन्हा असे अर्ज मागिवले जाणार आहेत तेव्हा ते पुन्हा अर्ज करू शकणार आहेत. मानवजातीसाठी मंगळावर वस्ती ही जायंट लीप आहे. अर्ज केलेल्या आणि निवड झालेल्या नागरिकांना या मोहिमेत अर्ज करण्यामागे कोणती प्रेरणा मिळाली हे जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत. दर दोन वर्षांनी चार जणांना मंगळावर पाठविले जाणार आहे. मानवरहित पहिले मिशन २०१८ साली पार पाडले जाणार आहे.