माळशेज घाटात एसटी दरीत कोसळून २७ प्रवासी ठार

मुंबई- माळशेज घाटाजवळ ठाणे ( विठ्ठलवाडी) -अहमदनगर एसटी बस आज (गुरुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास दरीत कोसळल्याची घटना घडली. या बसमध्ये 43 प्रवाशी प्रवास करीत होते. त्यापैकी २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतात १४ महिला व १३ पुरूषांचा समावेश आहे. याचबरोबर आणखी १०जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतात ड्रायव्हर व कंडक्टरचा समावेश आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रूपये दिले जातील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी दिली. तसेच जखमींचा खर्च एसटी महामंडळ करणार आहे. दरम्यान, मृताचा आकडा वाढण्याची शक्यता असून तो 40च्या वर जाईल असे सांगण्यात येत आहे.

घाटात एक लाकडाने भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान मदतकार्य करीत आहेत. बस अपघात इतका भीषण आहे, की एसटी बस चकनाचूर झाली आहे. तसेच यातील बहुतेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार 37 ठार तर आणखी 6 जण गंभीर असून मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमी प्रवाशांना मुरबाड, टेकवाडे येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.