नांदेड – महाराष्ट्रातील सर्वात मोठी जातपंचायत रद्द होणार आहे. तब्बल पाच दिवस चालणारी नांदेडच्या माळेगाव यात्रेतील जातपंचायत रद्द करण्याचा महत्त्वूपूर्ण निर्णय पंचांनी घेतला आहे. वैदू, गोसावी, मसणजोगी, कुरमुडे जोशी, कैकाडी, डोंबारी, पारधी आणि डवरी या समाजातील नागरिकांची ही जात पंचायत होती.
जाचपंचायतीचे जाचक निर्णय, समाजातील तरुणांनी पुकारलेलं बंड तसंच नुकताच मंजूर झालेला जादूटोणाविरोधी कायदा, या पार्श्वभूमीवर मुख्य पंच दुर्गा चव्हाण यांनी यंदापासून जातपंचायत बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या जात पंचायतीला उच्च न्यायालयाचा दर्जा असल्याने जनतेमध्ये पंचायतीचा मोठा दबदबा होता.
नांदेड, लातूर, परभणीच्या सीमेवर असणार्या माळेगावात जत्रेदरम्यान ही जातपंचायत भरवली जात असे. कित्येक वर्षापासून ही प्रथा सुरू होती, पण आता या समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक सुधारणावादी निर्णय घेण्यात येत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जातपंचायती लढ्याविरोधात आपलं अवघं आयुष्य खर्ची घातलं. आज दाभोलकर आपल्यात नाहीत, मात्र जातपंचायत रद्द झाल्याने दाभोलकरांच्या लढ्याला मोठं यश आल्याचे पाहायला मिळत आहे.