भारतात ऑनलाईन खरेदीत ८८ टक्के वाढ

नवी दिल्ली – आर्थिक मंदी, महागाईचा देशातील ऑनलाईन खरेदीवर कोणताही विपरित परिणाम झाला नसल्याचे असोचेमने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. २०१३ सालात भारतातील ऑनलाईन खरेदीत ८८ टक्के इतकी वाढ झाली असून एकूण उलाढाल १६ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. इंटरनेटचा वाढलेला वापर, इंटरनेट द्वारा पैसे चुकते करण्यासाठी उपलब्ध झालेले अनेक पर्याय यामुळे ई कॉमर्सला चालना मिळाल्याचे असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांचे म्हणणे आहे.

असोचेमच्या अहवालानुसार ऑनलाईन खरेदीत आजपर्यंत गॅजेटस, कपडे, दागिने घर आणि स्वयंपाकासाठी गरजेच्या असलेल्या वस्तू यांचे प्रमाण अधिक होते मात्र आता त्यात आधुनिक जीवनशैलीला अनुरूप घड्याळे, पुस्तके, सौदर्यप्रसाधने, अत्तरे आणि लहान मुलांसाठीची उत्त्पादने यांचीही भर पडली आहे. २०११ सालात ऑनलाईन खरेदीची उलाढाल ६.३ अब्ज डॉलर्सवर होती ती दोन वर्षात म्हणजे २०१३ पर्यंत १६ अब्जांवर पोहोचली आहे आणि हीच उलाढाल २०२३ सालापर्यंत ५६ अब्ज डॉलर्सची पातळी गाठेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन खरेदीत मुंबई प्रथम स्थानावर असून त्यापाठोपाठ दिल्ली आणि कोलकाताचा नंबर आहे. ऑनलाईन खरेदीत १८ ते २५ वयोगटातील खरेदीदारांचे प्रमाण ३५ टक्के आहे तर हेच प्रमाण २६ ते ३५ वयोगटात ५५ टक्के इतके आहे असेही या अहवालात म्हटले गेले आहे.