अहमदनगरच्या महापौरपदी संग्राम जगताप

अहमदनगर – नगरचे पाचवे महापौर म्हणून संग्राम जगताप व उपमहापौर म्हणून सुवर्णा कोतकर यांच्या निवडीवर सोमवारी मतदानाची मोहोर उमटली. दोघांनी प्रत्येकी १२ मतांनी प्रतिस्पर्धी युतीच्या उमेदवारांचा पराभव केला. महापालिकेवर दोन्ही काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आणि गुलालाची उधळण करून व्यक्त केला.

महापालिकेच्या ६८ जागांसाठी गेल्या १५ डिसेंबरला मतदान झाले. १६ रोजी झालेल्या मतमोजणीनंतर काँग्रेस आघाडीला २९ (राष्ट्रवादी १८ व काँग्रेस ११), तर युतीला २६ (शिवसेना १७ व भाजप ९) जागा मिळाल्या. याशिवाय ९ अपक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ४ सदस्य निवडून आल्याने त्रिशंकू महापालिकेत बहुमतासाठीचा ३५ संख्याबळाचा आकडा कोण जमवणार व कोणाची सत्ता स्थापन होणार याची उत्सुकता केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात होती.

आघाडीने सात अपक्षांसह मनसेच्या चार जणांचा पाठिंबा मिळवून बहुमतासाठीची ताकद जमवली व सोमवारी मतदानातून त्यावर शिक्कामोर्तब झाले. महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नूतन नगरसेवकांची सभा महापालिकेत झाली. महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे जगताप व शिवसेनेचे अनिल शिंदे, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर व भाजपचे बाबासाहेब वाकळे यांच्यात लढत झाली. मतदानात जगताप व कोतकर यांना प्रत्येकी ४०, तर शिंदे व वाकळे यांना प्रत्येकी २८ मते मिळाली.