कॉंग्रेसने पी.एम. पदाचा उमेदवार जाहीर करावा – चिदंरबरम

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीतला आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असे मत अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले आहे. हे आपले वैयक्तिक मत आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय शेवटी पक्षाने घ्यायचा आहे, असे श्री. चिदंबरम् म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आजकाल सांसदीय राज्यपद्धतीतही लोक मतदान करताना राजकीय पक्षांना, त्यांचा नेता कोण आहे असा प्रश्‍न विचारायला लागले आहेत. हा बदल कॉंग्रेस पक्षाने स्वीकारला पाहिजे असे श्री. चिदंबरम् म्हणाले.

गेल्या १५-२० वर्षांपासून विधानसभांच्या निवडणुकांतही असा प्रवाह दिसत आहे. विशेषत: तामिळनाडूत गेल्या ३० वर्षांपासून दोन मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांकडे बघूनच निवडणुका होत असतात असे श्री. चिदंबरम् यांनी दाखवून दिले.

भारतीय जनता पार्टीने गेल्या सप्टेंबरमध्येच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आहे. तेव्हापासून कॉंग्रेसवरही तसा दबाव येत आहे. येत्या १७ जानेवारीला कॉंग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.