बंगलोर – भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडून कर्नाटक जनता पार्टी स्थापन करणारे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पक्षात परत येण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. आपण भाजपात परत यावे अशी जनतेची इच्छा आहे असे ते काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आपण कर्नाटकात जिथे जिथे जातो तिथे लोक आपल्याला भाजपात परत येण्याची विनंती करतात असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वांनी बळ एकवटण्याची गरज आहे, असेही श्री येडियुरप्पा म्हणाले. त्यासाठी २०१२ सालच्या नोव्हेंबर त्यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक भारतीय जनता पार्टी हा पक्ष बरखास्त करावा लागेल. त्यास ते तयार आहेत.
श्री. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केला असा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यांना लोकायुक्तांनी दोषी ठरवले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता. म्हणून चिडून त्यांनी पक्षाचा त्याग करून नवा पक्ष स्थापन केला होता.