केजरीवाल म्हणजे पुंगीवाले गारुडी! – उद्धव ठाकरे

मुंबई- ‘भारतीय लोकशाही ही चमत्कारिक आहे. ती कधी कोणत्या पुंगीवाल्या गारुड्याच्या मागे जाईल याचा नेम नाही,’ अशी शेरेबाजी करतानाच, ‘सध्या ही पुंगी केजरीवाल वाजवत असून दिल्लीची जनता डोलत आहे,’ अशा बोचऱ्या शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील सत्ता परिवर्तनाचे विश्लेषण केले आहे.

प्रस्थापित राजकीय पक्षांना वैतागलेल्या दिल्लीतील सामान्य जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून क्रांतिकारी सत्ता परिवर्तन घडवून आणले. केजरीवालांच्या या यशाचे कौतुक देशभरात होत असताना उद्धव यांनी मात्र ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांना ‘पुंगीवाले गारुडी’ म्हणून हिणवले आहे.

राजकीय इतिहासाचे दाखले देत उद्धव यांनी टोमणे हाणले आहेत. केजरीवाल यांच्या शपथविधीला झालेल्या गर्दीचीही ‘तांत्रिक’ गर्दी म्हणून संभावना केली आहे. भाजपने दिल्लीत अल्पमतातील सरकार स्थापन करायला हवे होते, असे मतही उद्धव यांनी व्यक्त केले आहे.