खुनाच्या आरोपातून सिद्धराम म्हेत्रेंची सुटका

सोलापूर – अक्कलकोट येथील भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा आरोप असलेले माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे व त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांची सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली. २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे भाजपाच्या सभेवर गोळीबार झाला होता. त्यात भीमण्णा कोरे या भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह २९ जणांवर या आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणात शंकर म्हेत्रे मुख्य आरोपी होते. न्यायालयाने म्हेत्रे बंधूंसह १८ जणांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, अन्य ११ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यापैकी एकाला चार वर्षांची तर दहा जणांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.