फॉर्म्युला वन रेसची चॅपियनशीप सात वेळा मिळविलेला कुशल खेळाडू मायकेल शूमाकर फ्रान्समधील आल्प पर्वतराजीतील मेरिबल रिझॉर्ट या ठिकाणी स्किईंग करत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त आहे. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून तो कोमामध्ये आहे. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे न्यूरोसर्जनचे मत आहे.
चव्वेचाळीस वर्षीय मूळचा जर्मन असलेला मायकेल कार रेसिगमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्वित्झरर्लंडमध्ये आपली पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहे. त्याचे फ्रान्समधील मेरिबल रिझॉर्ट येथे हॉलिडे होम आहे. तेथील सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मायकेल स्कीईंग करत होता तेव्हा त्याच्या डोक्यावर हेल्मेट होते. मात्र वेगावर त्याचे नियंत्रण न राहिल्याने तो खडकावर जोरात आपटला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरीत रूग्णालयात हलविले गेले असून डॉ. गेरार्ड सायलंट त्याच्यावर उपचार करत आहेत. मायकेलच्या मेंदूला आणि पाठीच्या मणक्याला इजा झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले जात आहे.
मायकेल हा सर्वाधिक यशस्वी फॉर्म्युला वन चालक असून त्याने आत्तापर्यंत ९१ रेसेस जिंकल्या आहेत. गेली दोन दशके या खेळात कामगिरी बजावल्यानंतर तो गेल्या वर्षीच निवृत्त झाला आहे. त्याने फेरारीमधून २००६ लाच निवृत्ती घेतली होती व त्यानंतर तो मर्सिडीजतर्फे रेसिंग स्पर्धेत उतरत होता.