अणुऊर्जा प्रकल्पाला आपचा विरोध

तिरुनवेली- तामिळनाडूतल्या कुडानकुलम येथील अणु ऊर्जा प्रकल्पाला आम आदमी पार्टीने नेहमीच विरोध केला आहेे. या बाबत आपला पक्ष जनतेच्या बाजूने रहात आला आहे. यापुढेही तो जनतेच्या बाजूने असेल आणि पक्षाचा या प्रकल्पाला विरोध असेल असे आम आदमी पार्टीचे नेते प्रशांत भूषण यांनी काल जाहीर केले.

हा प्रकल्प तामिळनाडूत ज्या गावात उभा राहिला आहे त्या इडिन्ताकुरायी या गावात काल या प्रकल्पाला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात प्रशांत भूषण यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी आपली या संबंधीची भूमिका मांडली. आपल्या पक्षाचा केवळ कुडानकुलम येथीलच नाही तर अन्य कोणत्याही अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकाराची ऊर्जाच नको असे आपले मत आहे असे ते म्हणाले.

आम आदमी पार्टी हा पक्ष कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहे. जनता या दोन्ही पक्षांना कंटाळली आहे कारण हे दोघेही भ्रष्ट आहेत अशी जनतेला खात्री पटली आहे असे प्रशांत भूषण यांनी प्रतिपादन केले. हा पर्याय नेमका कसा आहे आणि तो कसा कारभार करणार आहे याची झलक दाखवण्यासाठी आम आदमी पार्टीने दिल्लीत सरकार स्थापन केले आहे असे ते म्हणाले. हा पक्ष जनतेला पारदर्शी आणि स्वच्छ तसेच भ्रष्टाचार मुक्त सरकार देईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.