अनोखी वैशिष्ट्ये असलेली पर्यटनस्थळे

पर्यटन ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती मानली जाते. निसर्गसौदर्य पाहण्यासाठी, सुंदर स्थळांच्या दर्शनासाठी, अथांग समुद्राचा आनंद लुटण्यासाठी. वन्य जीवांचे दर्शन घेण्यासाठी तर कधी मानसिक शांततेसाठी, थकलेल्या जीवाला विसावा देण्यासाठी अशा अनेक कारणांनी माणूस पर्यटन करत असतो. त्याचबरोबर त्या त्या ठीकाणची संस्कृती जाणून घेणे, जीवनमूल्ये समजावून घेणे याचीही ओढ माणसाला असते. पर्यटनात जगभरात फ्रान्स देश नंबर एकवर असल्याचे सांगितले जाते.

जगभरातील पर्यटनस्थळांची कांही खास वैशिष्ट्येही आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, सौदी अरेबिया हा जगातला असा देश आहे की जेथे एकही नदी नाही. सॅन फ्रान्सिस्को या अमेरिकेतील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात कबुतरांना दाणे टाकणे कायद्याच्या विरोधात असून त्यासाठी दंड अथवा शिक्षाही होऊ शकते. तसेच अमेरिकेतील मायानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लास वेगास शहरात हजारोंच्या संख्येने कॅसिनो म्हणजे जुगाराचे अड्डे आहेत मात्र त्यातील एकाही कॅसनो मध्ये तुम्हाला घड्याळ आढळणार नाही.

व्हेनिस हे इटलीतील सुंदर शहर हळूहळू पाण्यात बुडते आहे. मात्र त्यापेक्षाही वेगाने मेक्सिको सिटी पाण्याखाली जात असून हा वेग प्रतिवर्षाला १० सेंमी इतका आहे. स्वित्झरर्लंड हा तर पर्यटकांसाठी स्वर्ग मानला जातो. मात्र येथील स्वयंपाक्यांना तुम्ही जेवणात जादा मीठ आणि मसाले वापरण्याची सूचना दिलीत तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. जपानमधील टोकियोतील प्राणीसंग्रहालय वर्षातून दोन महिने बंद ठेवले जाते. या मागचे कारण म्हणजे सतत येणार्‍या पर्यटकांपासून या जनावरांना थोडा आराम मिळावा, ब्रेक मिळावा अशी त्यामागे भावना आहे.

पिसाचा झुकता मनोरा हा प्रथम घंटा मनोरा म्हणून बांधला गेला होता. तसेच अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रान्सने बनविला असून तो १८८४ मध्ये अमेरिकेला भेट म्हणून दिला गेला आहे. पर्यटन म्हणजे प्रवास आलाच. तुम्हाला सर्वात कमी वेळाचा म्हणजे केवळ दोन मिनिटांचा विमान प्रवास करायचा असेल तर स्कॉटिश बेट गाठावे लागेल. या बेटापासून पापावेस्ट पर्यंतचा विमान प्रवास हा जगातील सर्वात कमी वेळाचा विमान प्रवास असून त्यासाठी केवळ दोन मिनिटे लागतात.