अनंतपूर: बंगलोर-नांदेड एक्स्प्रेसला आंध्रप्रदेशच्या अनंतपूरमध्ये आग लागल्याने २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आगीत २० प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी धर्मावरम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे साडे तीन वाजता ही दुर्घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्यारचे समजते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बंगलोरहून नांदेडला येणा-या एक्स्प्रेसच्या थर्ड एसीच्या बी-वन बोगीला पुट्टापर्थीजवळ आग लागली. त्यानंतर आग आणखी दोन बोगींमध्ये पसरली, मात्र त्यावर लवकरच नियत्रंण मिळवले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अनंतपूरच्या डीआयजींनी ही माहिती दिली. दरम्यान बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान, नांदेडमधील ज्ञानमाता इंग्लिश स्कूलचे ४० विद्यार्थी याच एक्स्प्रेसने बंगलोरहून परतत होते. जळालेल्या कोचच्या शेजारच्या या कोमचमध्ये सर्व विद्यार्थी होते. रेल्वे अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत
याआधी २२ मे २०१२ रोजी अनंतपूर जिल्ह्यातच पेनुकोंडा रेल्वे स्टेशनवर अपघात झाला होता. बंगलोर-हम्पी एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर एका बोगीला आग लागली होती. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता.