आम आदमीचे दुसरे पाऊल

आम आदमी पार्टीने दिल्लीत यशस्वी पाऊल टाकले आहे. परंतु हा पक्ष आपले दुसरे पाऊल कुठे टाकेल या विषयी विलक्षण उत्सुकता निर्माण झालेली आहे. या पार्टीच्या नेत्यांनी पक्षाचे स्वरूप देशव्यापी करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली आहे. एखादा पक्ष देशव्यापी करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण आपला देश ङ्गार मोठा आहे आणि त्याची पाळेमुळे अशी देशाच्या विविध भागात पसरवणे, तेथे कार्यालय स्थापन करणे, ते चालविण्याची व्यवस्था करणे या गोष्टी ङ्गार अवघड असतात. पण तरीसुध्दा आम आदमी पार्टी या दृष्टीने कंबर कसत आहे. या पक्षाने दिल्लीत विधानसभेच्या ७० पैकी २८ जागा जिंकल्या आणि त्याचा देशभर गवगवा झाला. त्यांच्या या प्रभावाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे आणि काही नि:स्पृह, प्रामाणिक लोकांनी आम आदमी पार्टीच्या मार्गाने राजकारणात प्रवेश करावा असा विचार सुरू केला आहे. आजवर ज्या लोकांनी राजकारणाचा कधी विचारही केला नव्हता आणि राजकारण हे आपल्यासाठी योग्य स्थान नाही असे समजून जे लोक राजकारणापासून दूर राहिले होते त्यांना आता अशी आशा वाटायला लागली आहे की, भारतातले लोक अशा अशा अराजकीय लोकांना निवडून देण्याकडे कललेले आहेत.

म्हणून काही अभियंते, विचारवंत, लेखक, कवी, शासकीय अधिकारी यांच्या मनात आम आदमी पार्टीचा विचार यायला लागला आहे. त्याचा काय परिणाम होईल, ते लोक कितपत राजकारणात उतरतील, उतरले तर कितपत यशस्वी होतील हे सारे पुढच्या चर्चेचे मुद्दे आहेत. परंतु तूर्तास तरी आम आदमी पार्टीने देशाच्या शहरी भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे आणि पुढचे एक राज्य ताब्यात घेण्यासाठी म्हणून हरियानाची निवड केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे उमेदवार हरियानातल्या सगळ्या म्हणजे १० लोकसभा जागांवर उभे राहिलेले दिसतीलच, पण त्यानंतर लगेच म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीतही सगळ्या जागा आम आदमी पार्टी लढवील. या पक्षाचे भारताच्या राजकारणातले वर्चस्व कितपत वाढणार आहे याची परीक्षा त्यांच्या हरियानातल्या यशावरून होणार आहे. त्यांनी हरियानाकडे लक्ष देण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे जिंकण्यास सहजशक्य असे राज्य म्हणून हरियाना त्यांना अनुकूल वाटत आहे. हरियानामध्ये आम आदमी पार्टीची एक परीक्षा झालेली आहे.

दोन वर्षांपूर्वी हरियानाच्या हिस्सार लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला होता. त्यावेळी अण्णा हजारे यांचे जनलोकपाल विधेयकासाठीचे आंदोलन मोठ्या भरात आलेले होते. ऑक्टोबर २०११ मध्ये ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अण्णा हजारेही सक्रीय झाले होते. परंतु त्यावेळी आम आदमी पार्टी स्थापन झालेली नव्हती. परंतु अण्णा आणि केजरीवाल यांनी मिळून या निवडणुकीत तसा अपक्ष प्रचार केला होता. कोणाच्याही बाजूने त्यांनी मते मागितली नाहीत आणि उमेदवारही उभा केला नाही. परंतु त्यांच्या प्रचाराचा रोख कॉंग्रेसच्या विरोधात होता. त्यांनी भाजपाला मते द्या असे आवाहन केले नाही. परंतु कॉंग्रेसला मते देऊ नका, असे मात्र सूचित केले. परिणामी कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत तर झालाच, पण त्याचे डिपॉझीट सुद्धा गेले. आता अरविंद केजरीवाल अण्णांचे सहकार्य न घेता हरियानाच्या मैदानात उतरण्याच्या विचारात आहेत. दिल्लीचे वारे हरियानात पटकन् पोचतात. राज्य छोटे आहे आणि तिथे आता सत्तेवर असलेले भूपिंदरसिंग हुडा यांच्या नेतृत्वाखालचे कॉंग्रेसचे सरकार ङ्गार भक्कम स्थितीत नाही. हरियाना आणि दिल्लीतल्या लढतीमध्ये एक मात्र ङ्गरक आहे. दिल्लीतली लढत तिरंगी होती, हरियानातली लढत चौरंगी होणार आहे. कॉंग्रेस, आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला ओमप्रकाश चौताला यांचा इंडियन नॅशनल लोकदल हा पक्ष असे तीन कोन आहेत. शिवाय भूपिंदरसिंग हुडा यांच्या बहुमतासाठी त्यांना मदत करणार्‍या हरियाना जनहित कॉंग्रेस या पक्षाने भारतीय जनता पार्टीशी युती केली आहे.

या युतीचा एक चौथा कोन तिथे निवडणुकीच्या रिंगणात आहे. आम आदमी पार्टी दिल्लीत विजयी झाली, त्यामुळे भारताच्या भावी राजकारणामध्ये तिचा नेमका काय परिणाम होईल याविषयी चर्चा सुरू झालेली आहे आणि या प्रश्‍नाचे उत्तर आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला मिळणार आहे. परंतु त्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला ङ्गार मोठे यश मिळाले नाही तरी एकेका राज्यात पाय पसरण्याचा प्रयोग म्हणून आम आदमी पार्टीच्या हरियानातल्या यशाकडेच लक्ष द्यावे लागेल. लोकसभा निवडणूक किंवा हरियाना विधानसभा निवडणूक या आम आदमी पार्टीसाठी दोन मोठ्या परीक्षा तर राहणार आहेतच, पण हा पक्ष दिल्लीत कसा कारभार करतो हीही एक मोठी परीक्षा राहणार आहे. त्यांनी दिल्लीत चांगला कारभार केल्यास देशभरात त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.