अहमदाबाद – दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीला पाठींबा देण्यावरून कॉंग्रेस पक्षात बरेच मतभेद आहेत आणि काही लोकांनी हा पाठींबा काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे. असे मतभेद असले तरी कॉंग्रेस पक्ष आम आदमी पार्टीचा पाठींबा काढून घेणार नाही, पक्षाचा पाठींबा कायम असेल असे सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव खासदार अहमद पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी काल पक्षाने आम आदमी पार्टीला दिलेला पाठींबा वादग्रस्त असल्याचे नमूद केले होते. त्याशिवाय हा पाठींबा दिल्याचा राग मनात धरून युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच कार्यालयामध्ये धुडगूस घालून मोडतोड केली होती. कॉंग्रेसने हा पाठींबा ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी एका गटाने केली होती. या सगळ्या घडामोडींमुळे आम आदमी पार्टीच्या सरकारबद्दल कॉंग्रेसचे नेमके धोरण काय, याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
दुसर्या बाजूने आम आदमी पार्टीने सुद्धा या पाठिंबाबाबत संभ्रम निर्माण होईल अशी विधाने केली होती. दिल्लीतले सरकार केवळ आम आदमी पार्टीचे असेल, त्यात कॉंग्रेसचा मंत्री नसेल आणि सत्तेवर आल्यानंतर हा पक्ष कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराची चौकशी करील अशी विधाने आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केली होती. अशा रितीने सत्तेवर येण्याच्या आधीच सरकारच्या स्थैर्याबाबत उलटसुलट चर्चेला प्रारंभ झाला होता. परिणामी अहमद पटेल यांना हा खुलासा करावा लागला.