कॉँग्रेसचा सायबर आर्मी उभारण्याचा निर्णय

बडोदा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी कॉँग्रेसने सायबर आर्मी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मंगळवारी ही घोषणा केली. २०१४मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सोशल मीडियाचा वापर करून आपली फुटीरतावादी विचारसरणी देशात पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा मुकाबला करण्याचे कॉँग्रेसने ठरवले आहे, अशी माहिती पटेल यांनी भडोच येथे काँग्रेसच्या माहिती-तंत्रज्ञान शाखेच्या प्रशिक्षण शिबिरात दिली.

गुजरातमध्ये भाजपने खोटेपणाचा कळस गाठला आहे. तो देशात पसरू नये म्हणून कॉँग्रेसने सायबर आर्मी तयार करण्याचे पाऊल उचलले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीने गेल्या नऊ वर्षात विकासाची मोठी कामे देशात केली आहेत. या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे, असेही पटेल म्हणाले. मुंबईत भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी पक्षासाठी मत न मागता ह्यव्होट फॉर इंडियाह्णचा नारा दिला. हा प्रकार जनतेच्या भावनांशी खेळण्याचा आहे. गुजरातमध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून हिंसाचार झाला नाही, या मोदींच्या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली.

देशात सर्वत्र गुजरातच्या विकासाच्या बाता मारल्या जातात, वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. गुजरातमध्ये १८ लाख तरुण बेकार आहेत. राज्य सरकारची स्वत:ची वीज निर्मिती केंद्रे असताना खासगी कंपन्यांना वीज निर्मिती उभारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील ४५ टक्के मुले कुपोषणाचे बळी ठरले आहेत, याकडे पटेल यांनी लक्ष वेधले. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तत्त्वज्ञानावर गुजरातचा विकास झालेला आहे. हे दोन्ही नेते आता जिवंत असते तर त्या दोघांनीही मोदींच्या विकासाच्या मॉडेलला नाकारले असते, असे पटेल यांनी सांगितले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली यांपैकी कोणत्याही राज्यात मोदींची कोणतीही लाट नव्हती, असे ते म्हणाले. दिल्लीमधील आम आदमी पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबाबतही त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ह्यआपह्णने जी आश्वासने दिली होती ते ती कशी पूर्ण करतात हे पाहण्यासाठीच काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी सांगितले.