चीनमध्ये दरवर्षी १ लाख गाड्यांनाच मिळणार लायसन्स

बिजिंग – वायू प्रदूषण आणि कार्बन उर्त्सजन कमी करण्यासाठी चीनमध्ये नवीन कायदा लागू केला गेला असून त्यानुसार दरवर्षी फक्त १ लाख गाड्यानाच लायसन्स दिले जाणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार चीनमधून ७० लाख टनांहून अधिक विषारी वायू वातावरणात सोडला जात असून प्रदुषणात चीन पहिल्या क्रमांकावर आहे.त्या खालोखाल अमेरिकेचा नंबर असून भारत चौथ्या स्थानावर आहे.

बिजिंग, शांघाय, तियानजीन आणि गुईयांग या चार शहरात नवा नियम लागू केला गेला असून त्यामुळे गाड्या घेण्यासाठी नागरिक अक्षरशः लाईन लावून उभे आहेत. यंदाच्या वर्षात गाडीची नोंदणी करण्याचा कोटा संपला तर पुढील वर्षापर्यंत ताटकळावे लागेल अशी नागरिकांना भीती आहे. तियानजीन शहराची लोकसंख्या १ कोटी ४० लाख आहे. २०१२ या सालात चीनमध्ये २३ लाख ६० हजार कार नोंदणी केल्या गेल्या आहेत.

नवीन लायसेन्स देताना लॉटरी पद्धत राबविली जाणार आहे. त्याद्वारे ६० हजार लायसन्स दिली जातील. नागरिकांना विविध ठिकाणी लॉटरी सेंटरवरून लॉटरी खरेदी करावी लागणार आहे. नंतर लकी  ड्रॅ काढून त्यात नंबर लागलेल्यांनाच लायसन्स दिले जाणार आहे. दरवर्षी हीच प्रक्रिया राबविली जाणार आहे असेही समजते.