आपमतलबी आपवर भाजपाची टीका

नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने कॉंग्रेसचा पाठींबा घेऊन जनतेच्या भावनांची प्रतारणा केली असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांनी केली आहे. दिल्लीतल्या मतदारांनी आम आदमी पार्टीला कॉंग्रेसचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी जनादेश दिला होता. परंतु या पक्षाने त्याच कॉंग्रेसशी युती करून जनतेची ङ्गसवणूक केली आहे, असे भाजपाचे नेते डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतल्या जनतेने कॉंग्रेसच्या विरोधात कौल दिला होता आणि आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये कॉंग्रेसचे भ्रष्ट सरकार हटविण्यासाठी मते द्यावीत, असे आवाहन जनतेला केले होते. एवढेच नव्हे तर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी कॉंग्रेसचा उल्लेख विषारी साप असा केला होता. पण आता आपचे नेते हाच विषारी साप गळ्यात अडकवून घेत आहेत, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

दिल्ली विधानसभेतील मावळते विरोधी पक्षनेते भाजपाचे विजयकुमार मल्होत्रा यांनीही आम आदमी पार्टीवर टीका केली. त्यांनी कॉंग्रेसचा घेतलेला पाठींबा हा लोकशाहीविरोधी आहे, असे श्री. मल्होत्रा म्हणाले. भाजपाचे नेते विजय गोयल यांनी आम आदमी पार्टीने कॉंग्रेसचा पाठींबा घेतल्यामुळे तिची विश्‍वासार्हता संपली असल्याचे म्हटले आहे.