
राहुल गांधी यांना ङ्गेडरेशन ऑङ्ग चेंबर्स ऑङ्ग कॉमर्स या संस्थेने त्यांच्या सर्वसाधारण सभेपुढे भाषण करण्यासाठी पाचारण केले तेव्हा त्यांना सप्रेम भेट दिली. ती म्हणजे विकासाच्या ‘आड’ येणार्या पर्यावरण मंत्र्यांचा राजीनामा. या राजीनाम्याने व्यापारी मंडळ तर खुषच झाले असणार. ङ्गेडरेशन ही देशातल्या व्यापार्यांची आणि गुंतवणूकदारांची सर्वोच्च संस्था समजली जाते. त्यामुळे या संस्थेच्या सर्वसाधारण सभेपुढे एखाद्याला भाषणाला पाचारण केले जाणे हा त्याचा मान समजला जातो. आता राहुल गांधी हे कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून वेगाने पुढे यायला लागले आहेत. त्यामुळे या भावी पंतप्रधानांचे उद्योगाविषयीचे धोरण काय आणि कसे राहील या संबंधी देशातल्या या व्यापार्यांना उत्सुकता आहे आणि ते धोरण समजून घेण्याच्या हेतूने त्यांनी राहुल गांधी यांना पाचारण केले. मात्र या सभेपुढे जाताना कसलाही कटकटीचा मुद्दा उपस्थित होऊ नये याबाबत राहुल गांधी सावध झाले. कारण त्यांची सध्या नरेंद्र मोदींशी तुलना होत आहे आणि अशा मुद्याला सामोरे जाताना आपण कमी पडलो आहोत अशी आपली प्रतिमा होऊ नये म्हणून त्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून काही निर्णय घेतले. सध्या देशातल्या गुंतवणूकदारांमध्ये शासकीय कामातल्या दिरंगाईबद्दल मोठी नाराजी आहे. विशेषत: पर्यावरण खात्याकडून कोणत्याही उद्योगाला लवकर ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्याची पर्वा न करता उद्योग उभारता येत नाही.
गेल्या वर्षभरामध्ये देशाला पर्यावरण राखायचे आहे की उद्योग उभे करायचे आहेत अशी चर्चा आणि वाद निर्माण झाले आहेत. विशेषत: एखादा गुंतवणूकदार आपल्या सोयीच्या ठिकाणी उद्योग उभारायचा असल्यास पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले जावे अशी अपेक्षा व्यक्त करीत असतो. मात्र सरकारला त्याला परवानगीही द्यायची असते आणि पर्यावरणही राखायची असते. परंतु या संघटनेच्या सर्वसाधारण बैठकीत असा एखादा वादाचा मुद्दा उपस्थित होऊन आपली ङ्गजिती होऊ नये म्हणून राहुल गांधी यांनी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांना त्यांच्या मंत्रीपदावरून हटवले. या हटविण्याचे काही पडसाद राजकारणात उमटले आहेत. कॉंग्रेस पक्ष हा नरेंद्र मोदींच्या प्रभावाशी टक्कर देऊन निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी जी पावले टाकत आहे ती पावले कॉंग्रेससाठीच अडचणीचे ठरायला लागले आहेत आणि पक्ष वरचेवर नवनव्या संकटात सापडत चालला आहे. जयंती नटराजन यांना हटवणे हे असेच एक संकट ठरले आहे. त्यांना कोणत्याही कारणासाठी हटवले असले तरी त्यातून काही मूलभूत मुद्दे उपस्थित झाले आहेत.
त्यांना हटवले नसून संघटनात्मक कामासाठी मोकळे केले आहे, असा खुलासा सरकारतर्ङ्गे केला जात आहे. माणसाने खोटे बोलू नये, पण एखादा माणूस खोटे बोललाच त्याला एक खोटे लपविण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात. नटराजन यांच्या राजीनाम्याने तसेच झालेले आहे. त्यांना संघटनात्मक कामासाठी मोकळे केले असेल तर त्यांना एकट्यांनाच मोकळे का केले आणि पक्षामध्ये आणि सरकारमध्ये मोठे ङ्गेरबदल होणार असतील तर एकाच मंत्रीपदावर अशी कुर्हाड का आली? जयंती नटराजन या संघटना बांधण्यात ङ्गार पटाईत आहेत असेही कधी दिसून आलेले नाही. त्या तामिळनाडूच्या राहणार्या आहेत आणि गेल्या पंधरा वर्षांपासून त्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. म्हणजे त्यांना मागच्या दाराने खासदार करण्यात आलेले आहे. त्यांना लोकसभेवर निवडून येता येत नाही. अशा व्यक्तीला संघटनात्मक कामासाठी मोकळे केले आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे त्यांच्या या करिअरवरून दिसून येते. हा ङ्गेरबदलाचा एक भाग आहे असे राहुल गांधी यांचे म्हणणे मान्य केले तरी हा ङ्गेरबदल राहुल गांधी यांच्या भाषणाच्या आदल्या रात्रीच का केला गेला, हा प्रश्न उपस्थित होतोच. राहुल गांधी यांच्या सभेच्या सोयीसाठी एका मंत्र्याला मोकळे करणे या गोष्टीतून आता पंतप्रधानांचा सरकारवर अधिकार राहिलेला नाही हेही दिसून आलेले आहे.
राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान होण्यासाठी कंबर कसली असल्याचे दाखवले जात आहे. परंतु त्यांना किती कंबर कसता येणार आहे हा प्रश्नच आहे. कारण देशासमोरच्या कोणत्याही समस्येबाबत ते सातत्याने लढताना दिसत नाहीत. एका बाजूला भांडवलदारांसमोर भाषण करताना ते पर्यावरणाचा बळी देत आहेत आणि देशाचे पर्यावरण महत्वाचे नसून भांडवलदारांची गुंतवणूक महत्वाची आहे हे मान्य करीत आहेत. परंतु कधी तरी त्यांनी नेमकी याच्या विरुद्ध भूमिका घेतली होती याचीही आठवण होते. ओरिसातल्या नियमागिरी भागामध्ये तिथल्या आदिवासींना हटवून, जंगलाची तोड करून बॉक्साईटच्या खाणी सुरू केल्या जाणार होत्या. तिथेही पर्यावरण विरुद्ध विकास असा मुद्दा उपस्थित झाला होता. परंतु तिथे जाऊन राहुल गांधी यांनी आदिवासींची बाजू घेतली आणि पर्यावरणाचा तसेच आदिवासींचा प्रश्न निर्माण करून खाणी खोदता येणार नाहीत असे बजावले. तिथे त्यांनी पर्यावरणाची बाजू घेतली. तसे केल्याने आदिवासींची मते मिळतील, अशी त्यांना अपेक्षा होती. आता व्यापार्यांसमोर भाषण करताना त्यांनी नेमकी विरुद्ध भूमिका घेऊन अगदी पर्यावरण मंत्र्याला हटवून व्यापार्यांना खूष करणे पसंत केले.