रेल्वेच्या तिकिटाबाबत नव्या योजना

नवी दिल्ली – रेल्वेचे तिकीट हे ते खरेदी करणार्‍यांसाठीच असते. विशेषत: आरक्षणाच्या बाबतीत हा नियम कसोशीने पाळला जातो. एकाच्या नावावर आरक्षण करून त्या आरक्षणावर दुसरी व्यक्ती प्रवास करू शकत नाही. विशेषत: उच्च दर्जाच्या डब्यांमध्ये तर ज्याच्या नावावर आरक्षण आहे तोच प्रवास करत आहे की नाही हे पाहण्यासाठी परिचय पत्र आवश्यक ठरवले आहे. ते नसल्यास प्रवास बेकायदा ठरवला जातो. आता मात्र हा नियम थोडा शिथील करण्यात येणार आहे.

या संबंधात रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासणीसांनी काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार एखाद्या व्यक्तीला आपल्या आरक्षित तिकीटावर प्रवास करणे शक्य नसेल तर त्याचे तिकीट रद्द न होता त्यावर त्याच्या नातेवाईकाला प्रवास करता येणार आहे. मात्र त्याने आपल्या ऐवजी आपल्या नातेवाईकाला प्रवास करण्याची अनुमती मागणारा अर्ज प्रवासाच्या चोवीस तास आधी दाखल केला पाहिजे.

खालील अटींवर हा बदल करता येईल. १) आरक्षण करणारा व्यक्ती सरकारी नोकर असेल आणि त्याने सरकारी कामासाठी जाण्याकरिता आरक्षण केले असेल तर २) आपले आरक्षण रद्द करून दुसर्‍याला देण्याची विनंती करणार्‍याची आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, नवरा किंवा बायको या नात्यातला प्रवासी प्रवास करू शकेल. ३) आरक्षण बदलू इच्छिणारा प्रवासी हा विद्यार्थी असेल आणि त्याने प्रवासाच्या ४८ तास आधी अर्ज केला असेल तर त्याच्या नावावर दुसरा विद्यार्थी प्रवास करू शकेल.

४) तिकीटात बदल करू इच्छिणार्‍या व्यक्तीचा प्रवास विवाहानिमित्त होत असेल आणि ज्याच्या घरी विवाह आहे त्या कुटुंब प्रमुखाने अर्ज केला तर आरक्षणावर इतर व्यक्ती प्रवास करू शकेल. ५) प्रवास करू इच्छिणारे विद्यार्थी जर राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट असतील तर त्यांच्या ऐवजी दुसरा कॅडेट प्रवास करू शकेल.