चिनी सैन्याचे लडाख भागात आता तंबू

नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात लडाख भागात चिनी सैन्याची झालेली घुसखोरी आणि त्यांनी केलेले पाच भारतीयांचे अपहरण या गोष्टी ताज्या असतानाच आणि त्यातून निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा एकदा चीनने आगळीक केली असल्याने दोन देशांच्या संबंधातला तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातील घुसखोरीत चिन्यांनी पाच भारतीयांना पळवून नेले. असा प्रकार पहिल्यांदाच घडला होता.

या घटनेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी चीनच्या अशा कारवाया आणखी वाढतील, अशी भीती व्यक्त केली होती. ती खरी ठरली असून चिनी सैन्याने पुन्हा एकदा लडाख भागातील चेपझी गावाजवळ घुसखोरी करून तिथे आपले तंबू ठोकले आहेत.

सुमारे २० चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून आठ ते दहा तंबू ठोकले असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून चुमार भागामध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी सुरू आहे. त्या चुमार भागापासून चेपझी भाग अगदी जवळ आहे. लडाखचे मुख्य शहर लेह याच्यापासून चेपझीचे अंतर ३०० कि.मी. एवढे आहे. हा भाग अतीशय दुर्गम समजला जातो.