इन्फोसिसचे व्ही. बालकृष्णन यांचा राजीनामा

बंगलोर – भारतातील दोन नंबरची आय.टी.कंपनी असलेल्या इन्फोसिस मध्ये बीपीओ प्रमुख व बोर्ड सदस्य व्ही.बालकृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ३१ डिसेंबर २०१३ पासून ते इन्फोसिस मध्ये काम करणार नाहीत. कंपनीच्या अध्यक्षपदी नारायणमूर्ती यांचे पुनरागमन झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात वरीष्ठ अधिकारी एकामागून एक कंपनीतून बाहेर पडत असून व्ही.बालकृष्णन हे आठवे अधिकारी ठरले आहेत. बालकृष्णन यांच्याकडे कंपनीचे भावी सीइओ म्हणून पाहिले जात होते.

गुरूवारीच वरीष्ठ उपाध्यक्ष सुब्रह्मण्यम गोपाराजू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण मूर्ती यांचे चिरंजीव रोहन यांना कंपनीत दिले गेलेले पद आणि त्यांचा वाढता प्रभाव यामुळे अनेक वरीष्ठ अधिकारी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. बालकृष्णन यांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच राजीनामा देण्याची तयारी सुरू केली होती असेही समजते. नोव्हेबर महिन्यातच त्यांनी मुलींच्या नांवे असलेले इन्फोसिसचे १ लाख शेअर्स विकले होते.