मोदी पंतप्रधान झाल्यास हत्या करू – मौलाना मसूद अझहर

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांची हत्या केली जाईल अशी धमकी दिली आहे. या संघटनेचा पाकिस्तानात लपून बसलेला प्रमुख मौलाना मसूद अझहर याने भारतातल्या आपल्या सहकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय पाकिस्तानातल्या जमात उद्र दावा या संघटनेनेही अशीच धमकी दिली आहे. या संघटनेने आपल्या मुखपत्रात तसे नमूद केले आहे.

पाकिस्तानातल्या या संघटनांचा हा धोका ओळखून भारत सरकारने मोदी यांची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. त्यांना आधीपासूनच झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. आता या सुरक्षा व्यवस्थेतल्या अधिकाऱ्यांना अधिक सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाटण्यात झालेल्या मोदींच्या सभेत झालेले स्फोट हा या संघटनांचाच प्रयत्न होता आणि त्यांचे लक्ष्य मोदी हेच होते.

या संघटनांनी मोदी पंतप्रधान होता कामा नयेत अशी भूमिका घेतली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्या संघटना भारतीय जनता पार्टीला कधीही माफ करणार नाहीत असेही त्यांनी बजावले आहे. मोदी यांच्या जीवाला पाकिस्तानबरोबरच थायलंडमधील इस्लामी संघटनांकडूनही धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.