हैदराबाद – आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी तेलंगणाच्या निर्मितीबाबत कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या भूमिकेमागे जात असल्याचा आरोप फेटाळला असून आपण तेलंगण निर्मितीच्या विरोधात ठाम असल्याचे म्हटले आहे. तेलंगण निर्मिती रद्द होईपर्यंत आपण या भूमिकेवर ठाम राहणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव विधिमंडळासमोर चर्चेला आला आहे. त्याला अनेक आमदारांचा विरोध आहे. तो सदनात चर्चेलाही आणू नये अशी मागणी आमदारांनी केली होती पण शेवटी त्यावर चर्चा करायला ते तयार झाले आहेत. कारण हा प्रस्ताव नाकारायचा असला तरीही त्यावर चर्चा करणे कायद्याने बंधनकारक आहे हे त्यांना लक्षात आले आहे.
सोमवारी मुख्यमंंत्री किरणकुमार रेड्डी हे सदनात हजर नव्हते त्यामुळे त्यांनी आपला विरोध मागे घेऊन पक्ष श्रेष्ठींच्या मतानुसार चालण्याचे ठरवले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण ते काल सदनात आले आणि आपण आजारी असल्यामुळे आलो नसल्याचा खुलासा केला. आपण आपल्या अंगात जीव असेपर्यंत तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करणार असल्याचे ते म्हणाले.