इस्लामाबाद – पाकिस्तानने आज (गुरुवार) अब्दुल बसित या उच्चस्तरीय राजनैतिक अधिकाऱ्याची भारतामधील उच्चायुक्त म्हणून नेमणूक केल्याची घोषणा केली. बसित (वय 55) हे याआधी परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे स्वीकारतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, यामध्ये ऐनवेळी बदल करत पाक सरकारने त्यांची नेमणूक भारतामधील पाकिस्तानचे उच्चायुक्त या पदावर केली आहे.
तसेच याआधी सैयद इब्न अब्बास यांची नेमणूक भारतामधील पाक उच्चायुक्त म्हणून केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र अब्बास हे या पदासाठी “फारच कनिष्ठ’ असल्याने त्यांची नेमणूक ऐन वेळी रद्द करण्यात आली. आज यासंदर्भातील अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताबरोबरील संबंध सुधारण्यावर भर देणार असल्याची भूमिका घोषित केल्यानंतर बसित हे या पदाची सूत्रे स्वीकारत आहेत.
यामुळे त्यांची कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अब्बास यांची रद्द करण्यात आलेली नेमणूक पाककडून ही गेल्या महिन्याभरापेक्षा कमी काळात ऐनवेळी बदलण्यात आलेली चौथी महत्त्वपूर्ण नेमणूक आहे. बसित हे याआधी जर्मनीमधील पाकिस्तानचे राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळत होते. सलमान बशीर हे सध्याचे पाकचे भारतातील उच्चायुक्त आहेत.