देवयानी खोब्रागडेंची संयुक्त राष्ट्रसंघात बदली

नवी दिल्ली – अमेरिकेतल्या भारताच्या उपमहावाणिज्य अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील त्यांच्या अपमानप्रकरणानंतर भारत सरकारनं त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी देवयानी खोब्रागडे या न्यूयॉर्कमधल्या भारताच्या काऊन्सिलेट जनरलमध्ये वाणिज्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

आज संसदेत देवयानी खोब्रागडे प्रकरणावरुन वादंग उठलं असतांना सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देवयानी खोब्रागडे प्रकरणात भारताला कायदेशीररित्या लढता यावं यासाठी भारत सरकार कडक पावलं उचणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी दिली आहे. त्यासाठीच देवयानी यांची बदली संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेत बदली करण्यात आल्याचं सलमान खुर्शिद यांनी सांगितलं.

या बदलीमुळं आता देवयानी यांना कायद्याचे संरक्षण मिळणार आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करतांना पोलिसांना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यांची साधी चौकशी करण्यासाठी देखील आता भारत सरकारची परवानगी महत्वाची असणार आहे. देवयानी या न्यूयॉर्कच्या भारतीय दूतावासात कार्यरत होत्या. बदलीनंतरही त्या न्यूयॉर्कमध्ये कार्यरत असतील. पण त्यांना कायद्यानुसार संरक्षण मिळावं म्हणून आता त्यांची बदली संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आली आहे.

अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतवासातील उच्चउपायुक्त डॉ. देवयानी खोब्रागडे यांना देण्यात आलेल्या वागणुकीचे अमेरिकेने समर्थन केले आहे. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही अमेरिकेच्या मार्शल सर्व्हिसेसकडून करण्यात येणा-या चौकशीचा एक भागच असल्याचे अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अमेरिकन मार्शल सर्व्हिसकडून न्यूयॉर्कमध्ये आरोपीला अटक झाल्यास याच प्रकारे चौकशी करण्यात येते. चौकशीचा हा प्रकार काही नवीन नाही असे अमेरिकन प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

देवयानी खोब्रागडे यांना भारतीय नोकराचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळाप्रकरणी न्यूयॉर्क पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणाहून त्यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली होती. या अपमानास्पद वागणूकीची भारताने गंभीर दखल घेत भारतातील अमेरिकेच्या दूतवासांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली होती.अमेरिकेच्या या कृतीला भारतही चोख प्रत्युत्तर देत आहे.