
नवी दिल्ली – भ्रष्टाचाराला आळा घालण्यात महत्वपूर्ण ठरणा-या बहुचर्चित लोकपाल विधेयकावर बुधवारी लोकसभेने आपल्या मान्यतेची मोहोर उमटवली. राज्यसभेने केलेल्या सर्व सुधारणा स्वीकारत लोकसभेत आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले.

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराला आळा घालण्यात महत्वपूर्ण ठरणा-या बहुचर्चित लोकपाल विधेयकावर बुधवारी लोकसभेने आपल्या मान्यतेची मोहोर उमटवली. राज्यसभेने केलेल्या सर्व सुधारणा स्वीकारत लोकसभेत आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले.
हे विधेयक मंजूर होताच राळेगणसिध्दीमध्ये जल्लोषाला उधाण आले. हे विधेयक मंजूर झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून या विधेयकासाठी सुरु असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या लढयालाही यश आले आहे. समाजवादी पार्टी आणि शिवसेनेच्या खासदारांनी लोकपाल विधेयकाला विरोध केला. हा ऐतिहासिक कायदा मंजूर होत असताना, या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केले.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या सुष्मा स्वराज यांनी या विधेयकातील सुधारणांना पूर्ण पाठिंबा दिला. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस होता. राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अण्णांनी एका विद्यार्थीनीच्या हातून फळांचा रस पिऊन उपोषण सोडले.
भ्रष्टाचारा विरोधात एकटा लोकपाल कायदा पुरेसा नाही. भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची आणखीं सहा महत्वाची विधेयके आणण्याची योजना आहे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. लोकपाल विधेयकावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी ही मागणी केली.
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर केल्याबद्दल राळेगणसिद्धी परिवार व भारतीय जनतेच्या वतीने लोकसभा व राज्यसभेतील समाजवादी पक्ष सोडून सर्व खासदारांना प्रणाम करतो. भ्रष्टाचाराला ब्रेक लावण्यासाठी पहिल्यांदा असा कायदा होत आहे याचा आनंद आहे. मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा कायदा तयार केला जावा, अशी आमची विनंती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले.