बांगला देशात वैचारिक संघर्ष

ढाका – बांगला देशात येत्या पाच जानेवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. परंतु तिथल्या मुख्य विरोधी पक्षाने म्हणजे बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) ने निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्यामुळे मोठाच गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी अवामी लीग पार्टी यांनी मात्र विजयाच्या अपेक्षेने या निवडणुकीत दमदार पावले टाकली आहेत.

बांगला देशातल्या निवडणुकीला वैचारिक आणि धार्मिक स्वरूप आलेले आहे. अवामी लीग हा पक्ष त्यातल्या त्यात धर्मनिरपेक्षतावादी समजला जातो आणि या पक्षाच्या नेत्या शेख हसीना वाजेद या भारताशी सलोख्याचे संबंध असावेत अशा मताच्या आहेत. विरोधी बीएनपीने मात्र देशाची मुस्लीम देश ही ओळख अधिक गडद व्हावी असा आग्रह धरलेला आहे. अवामी लीग हा धर्मनिरपेक्षतावादी पक्ष असल्यामुळे त्या पक्षाला भारताचे प्रोत्साहन आहे असा बीएनपीचा आरोप आहे आणि म्हणून या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

१९७२ साली हा देश भारताच्या मदतीमुळेच स्वतंत्र झाला. त्यावेळी मुजीबूर रहेमान हे देशाचे नेते होते आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना वाजेद या त्यांच्याच कन्या आहेत. त्यांनी सध्या त्या युद्धाच्या काळातील जातीयवादी मुस्लीम नेत्यांना शिक्षा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुस्लीम जातीयवादी हे त्यांच्यावर चिडले आहेत आणि त्यातूनच निवडणुकीवरील बहिष्काराचे प्रकरण पुढे आले आहे.