निवडणूक रणनितीसाठी भाजपची आज बैठक

दिल्ली – दिल्लीत काँग्रेसचे समर्थन घेऊन आप पार्टी सरकार स्थापन करणार का याची चर्चा जोरात असतानाच बहुमत थोडक्यात निसटल्याने सावध झालेल्या भाजपने मात्र सहा महिन्यात पुन्हा निवडणुका होतील असे गृहित धरून या निवडणुका तसेच लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाची रणनिती ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्रदेश भाजप उच्चस्तरीय बैठक आज घेतली जात आहे.

सोमवारी प्रदेश भाजप कोअर ग्रूपची बैठक पार पडली आहे. त्यात सहा महिने अगोदरच निवडणूक रणनिती ठरविण्याचा निर्णय घेतला गेला होता. या निवडणुकांसाठी भाजप प्रत्येक घराघरात पोहोचणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणकांसाठीही हाच कार्यक्रम आखला गेला होता व त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले होते. मात्र हर्षवर्धन यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर झालेल्या विवादांमुळे ही योजना बारगळली होती.

वरीष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभेसाठी प्रचार करण्यास उशीरच झाला होता. कारण जेथे जेथे पक्षाचे कार्यकर्ते गेले तेथे आपचे कार्यकर्ते किमान तीन वेळा येऊन गेले होते असे सांगितले जात आहे. या निवडणुकांसाठी युवकांना मुख्य टार्गेट ठरविले गेले असून महिलांनाही मोठ्या संख्येने जोडले जाणार आहे असे समजते.