स्वतःपेक्षा जास्त पगार मोलकरणीला कसा देणार?

मुंबई – अमेरिकेतील भारतीय दूतावासातील डेप्युटी कॉन्सिल जनरल डॉ. देवयानी खोब्रागडे यांना मिळणा-या पगारापेक्षा मोलकरणीचा पगार अधिक आहे. त्यामुळे मोलकरणीला इतका पगार देणे कसे परडवणार असा सवाल देवयानीचे वडील व माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी विचारला आहे.

डॉ. देवयानी सध्या अमेरिकत दूतावासात नोकरीत आहेत. मोलकरणीला कमी पगार दिला म्हणून देवयानी यांना न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भर रत्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर याची चर्चा अमेरिकसह संपूर्ण भारतात झाली. या अटकेचे तीव्र पडसाद सरकारी पातळीवर उमटले. उच्च पदावर असलेल्या देवयानीला अटक करणे म्हणजे अमेरिकेने केलेला भारतीयांचा अपमान आहे, अशी सार्वत्रिक भावना देशात तयार झाली. या घटनेचा खोब्रागडे कुटुंबियांनीही तीव्र शब्दात निषेध केला.

याबाबत देवयानीचे वडील व माजी सनदी अधिकारी राहिलेले उत्तम खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, देवयानीने मोलकरणीला फसवले नाही. उलट ठरल्याप्रमाणे तिचा पगार देण्यात येत होता. भारतीय सरकारच्या सेवेत असलेल्या देवयानीला ४ हजार १२० डॉलर्स पगार आहे. मग मोलकरणीला ४ हजार ५०० डॉलर पगार कसा देणार, असा सवाल करीत त्यांनी अमेरिका सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध केला. संगीता रिचर्ड नावाची मोलकरीण देवयानीच्या घरी काम करते. ही मोलकरीण पगारवाढीसाठी ब्लॅकमेल करीत असल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले.