लाहोर – भारतामध्ये १८ वर्षाच्या आतील मुलांवर खटला चालवताना तो प्रौढ व्यक्तीला लागू असलेल्या कायद्याखाली चालवावा की नाही यावर वाद जारी असताना पाकिस्तानात मात्र १३ वर्षे वयाच्या एका मुलाला खून केल्याच्या प्रकरणात ५० वर्षे कैदेत राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतात १३ वर्षाच्या मुलाने खून केला असता तर त्याला दोन किंवा तीन वर्षे सुधारगृहात राहण्याची शिक्षा दिली गेली असती.
पाकिस्तानच्या गुजरानवाला जिल्ह्यात १३ वर्षे वयाच्या गोहर नवाज याने एका आरोपीला न्यायालयात नेले जात असताना त्याच्यावर गोळी झाडून त्याचा खून केला. या खुनाबद्दल त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि त्याला ५० वर्षे तुरुंगात राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
गोहर नवाज याने खून केलेल्या व्यक्तीचे नाव हाफिज घियाज असे असून त्याने गोहर नवाजच्या वडिलांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या वडिलांवरच्या प्राणघातक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून गोहर नवाजने हाफिज घियाजला संपवले.