रायगड – छत्तीसगडमध्ये नुकत्याच निवडण्यात आलेल्या विधानसभेच्या ९० आमदारांपैकी ६७ आमदार कोट्यधीश आहेत, अशी माहिती इलेक्शन वॉच डॉग या संघटनेने दिली आहे. या संघटनेने निवडून आलेल्या आमदारांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रांचे संकलन आणि विश्लेषण करून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या आमदारांपैकी १५ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, अशीही माहिती या संस्थेने काढली आहे.
या विधानसभेच्या मावळत्या सभागृहात २८ आमदार कोट्यधीश होते. त्यांची संख्या आता ६७ वर गेली आहे. कोट्यधीश आमदारांमध्ये कॉंग्रेसचे आमदार जास्त श्रीमंत आहेत. भाजपाचे एकूण आमदार ४९ असून त्यातले ३५ आमदार करोडपती आहेत तर कॉंग्रेसचे एकूण आमदार ३९ असून त्यातले ३० आमदार करोडपती आहेत. बसपाचा एकमेव आमदार या विधानसभेत निवडून आला असून तोही करोडपती आहे.
मावळत्या सभागृहातील आमदारांची सरासरी मालमत्ता १ कोटी ४५ लाख रुपयांची होती. ती आता ८ कोटी ८८ लाखांवर गेली आहे. कॉंग्रेसचे आमदार भाजपाच्या आमदारांपेक्षा श्रीमंत आहेत. कॉंग्रेसच्या आमदारांची सरासरी मालमत्ता १७ कोटी एवढी आहे, पण भाजपाच्या आमदारांची सरासरी मालमत्ता २ कोटी रुपये एवढी आहे.
गुन्हे दाखल झालेल्या आमदारांमध्ये ६ आमदार भाजपाचे तर ९ आमदार कॉंग्रेसचे आहेत. यापेक्षाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले ६६ उमेदवार निवडणुकीला उभे होते. त्यातले ५८ जण पराभूत झाले.