नवी दिल्ली – जनलोकपाल विधेयकासह अनेक महत्वाच्या विषयांवर नेहमीच मौन बाळगणार्या राहुल गांधी यांनी एकदम या विधेयकाच्या बाबतीत पुढाकार घेतल्यामुळे राजधानीतील राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा झालेला पराभव आणि दिल्लीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय यापासून धडा घेऊन राहुल गांधींनी हे पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे.
जनलोकपाल विधेयक मंजूर होण्याबाबत असा पुढाकार घेतल्यास आपली प्रतिमा बदलेल, असा या पुढाकारामागचा हेतू असावा असे बोलले जात आहे. या संबंधात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तिच्यात जनलोकपाल विधेयकाला सर्वांनी पाठींबा द्यावा, असे आवाहन केले. कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा भ्रष्टाचारामुळे मलीन झाली आहे. ती उजळ करण्याचा एक प्रयत्न म्हणून त्यांनी ही धडपड सुरू केली असल्याचे मानले जात आहे.
आम आदमी पार्टीच्या विजयातून धडा घेऊन राहुल गांधी आता काही पावले टाकत आहेत. परंतु आपण या विजयातून धडा घेतलेला आहे हे कबुल करण्याचा प्रांजळपणा त्यांच्याकडे नाही. उलट आपल्या या पुढाकाराचा आम आदमी पार्टीच्या विजयाशी काही संबंध नाही, असा खुलासा त्यांनी स्वत:हूनच केला आहे.
तसा प्रश्न कोणी विचारला नसतानाही त्यांनी असा खुलासा का करावा, असा प्रश्न पत्रकारांना पडला आहे. आपण आम आदमी पार्टीचे अनुकरण करत आहोत असे कुणाला वाटू नये याबाबत ते नको तेवढे सजग झालेले दिसत आहेत. यामागे ते आम आदमी पार्टीचे अनुकरण करत आहेत हे सत्य दडून राहू शकत नाही. एकंदरीत कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचाराशी मुकाबला करत आहे हे लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न यापुढे राहुल गांधी करतील असे वाटत आहे.