आता फतेपूरमध्ये २५०० टन सोने दडल्याचा साधूचा दावा

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात जमिनीखाली १ हजार टन सोने असल्याचा दावा करणार्‍या शोभन सरकार या साधूने आता फतेपूर मध्ये २५०० टन सोने जमिनीखाली असल्याचा दावा केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात यासंबंधीची याचिका सरकार यांनी दाखल गेली आहे. फतेपूर मधील सोने खणण्यासाठी राज्य शासन आणि तेथील जिल्हा प्रशासनाने सरकार यांना परवानगी द्यावी असे आदेश न्यायालयाने द्यावेत यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली असून त्याची सुनावणी पुढील आठवड्यात होईल असे समजते.

उत्तरप्रदेशातील उन्नाव येथेही असेच १ हजार टन सोने असल्याचा दावा सरकार यांनी केला होता. त्याची दखल घेऊन केंद्राने पुरातत्त्व विभागाला या ठिकाणी खोदकाम करण्याची परवानगी दिली होती. मात्र पंधरा दिवस खोदूनही कांहीच न मिळाल्याने अखेर हे खोदकाम थांबविण्यात आले. त्यावर शोभन सरकार यांनी या खोदकामाच्या वेळी त्यांना न बोलावल्याने सोने मिळाले नाही असे जाहीर केले होते. आता नव्या दाव्यानुसार ते म्हणतात की फतेपूर भागाचे धनबादच्या इंडियन स्कूल ऑफ माइन्स आणि आयआयटी कानपूर येथील तज्ञांनी प्राथमिक सर्वेक्षण केले आहे. येथे सोने सापडणार असा विश्वास असून खोदकामासाठी येणारा सर्व खर्च स्वतः करण्याची तयारीही शोभन सरकार यांनी दाखविली आहे.