लोकपाल विधेयकाला प्रथम प्राधान्य- कमलनाथ

नवी दिल्ली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे संसदीय कामकाज मंत्री कमल नाथ यांनी गुरुवारी स्पष्ट केले. लोकपाल विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या विधेयकाला आमचे प्रथम प्राधान्य असून, त्याखालोखाल अन्य विधेयके मांडणार असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.

सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याने, सरकार शुक्रवारपर्यंत हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत त्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सध्या तरी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. वेगवेगळया विधेयकांसाठी, चर्चेसाठी आम्ही वेळ निश्चित केली आहे. आम्ही प्राधान्य क्रमाची एक यादी तयार केली आहे. लोकपाल विधेयकाला आमचे प्राधान्य असून, राज्यसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर ते लोकसभेत येईल असे त्यांनी सांगितले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन पाच डिसेंबरला सुरु झाले असून, २० डिसेंबरला अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. सरकारला कुठलाही धोका नसून, ठरलेल्या मुदतीत निवडणूका होतील असे कालही कमलनाथ यांनी स्पष्ट केले होते. तरीही, सरकारला धोका असून, अविश्वास प्रस्तावामुळे सरकार अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Leave a Comment