नवी दिल्ली – समलिंगी संबंधांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निराशा प्रगट केली आहे. समलैंगिकांना त्यांचा अधिकार मिळवून देणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रत्येकाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी संसद यात लक्ष घालेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपली संस्कृती सर्वसमावेशक आणि सहनशील असल्याचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटत आला आहे असे सोनिया या निर्णयासंबंधी म्हणाल्या. सोनिया गांधींनी स्वत:हा या निर्णयावर नाराजी प्रगट केल्याने आता या निर्णयावर संसदेत चर्चा होण्याची शक्यता वाढली आहे. समलिंगी संबंधांना गुन्हेगारीच्या कक्षेतून मुक्त करण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल होणे आवश्यक आहे. यासाठी सरकार सर्व पर्यायांचा विचार करत असल्याचे केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले.
भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७७ नुसार समलिंगी संबंध गुन्हाच ठरतो असा महत्वपूर्ण निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयानंतर समलिंगी संबंधांचा पुरस्कार करणा-या अनेकांना धक्का बसला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने तीनवर्षांपूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणीत समलिंगी संबंधांना वैध ठरवले होते.